राज ठाकरेंकडून रिफायनरीसाठी सकारात्मक भूमिका; समर्थकांची माहिती
रत्नागिरी : कोकणात होणाऱ्या रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. समर्थकांविरोधात रिफायनरी विरोधकही पुन्हा एकदा मैदानात उतरलो आहेत. मात्र, या रिफायनरीवरुन आता शिवसेनेची गोची निर्माण झाली आहे. कोकणातील रिफायनरीला शिवसेनेचा पाठिंबा आहे की विरोध? यावर अजूनही चर्चाच सुरू आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिफायनरीला समर्थन दिल्याची माहिती समर्थकांनी दिली आहे.
राज ठाकरे सध्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राज ठाकरे यांची रिफायनरी समर्थक व विरोधक यांनी भेट घेतली. काही मिनिटं दोघांशीही राज ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी रिफायनरी समर्थकांनी राजापूरमध्येच हा प्रकल्प का झाला पाहिजे याची सखोल माहिती दिली. तसेच, रिफायनरी राजापूरमध्ये होण्यासाठी राज ठाकरे यांना निवेदनही दिले.
याशिवाय रिपब्लिक समर्थकांकडून 80 ग्रामपंचायतीचे संमती पत्र, 75 सामाजिक संघटनांचा रिफायनरीला पाठिंबा, 3500 एकर वरची शेतकऱ्यांची संमती पत्र राज ठाकरे यांना सादर करण्यात आली. तर, रिफायनरी विरोधकांकडून कोकणाच्या ब्ल्यू प्रिंटची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची रिफायनरीसाठी सकारात्मक भूमिका असल्याची माहिती समर्थकांनी दिली लोकशाहीला दिली आहे.
दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्यावरून शिवसेनेतच दोन गट असल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्टपणे पुढे आले आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रकल्प झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. तर, खासदार विनायक राऊत यांनी मात्र अजून स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. यामुळे रिफायनरीबाबत ठोस भूमिका घेण्यास शिवसेनेची गोची होत नाही ना? असा सवाल निर्माण झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकार कोकणातच रिफायनरी प्रकल्प करण्याबाबत आग्रही आहे.