मोदी तेरी कबर खुदेगी... हा विरोधकांचा आवडता डायलॉग; पंतप्रधानांची जोरदार फटकेबाजी
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उत्तर दिले आहे. यादरम्यान त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. यावर पंतप्रधानांनी विरोधकांचे वागणे शहामृगासारखे झाले आहे. विरोधी पक्ष त्यांना दिवसरात्र शिव्याशाप देतात. मोदी तेरी कब्र खुदेगी हा त्यांचा आवडता डायलॉग आहे. पण त्यांच्या शिव्या मी माझे टॉनिक बनवतो, असे म्हंटले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील जनतेने वारंवार आमच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी देशातील जनतेचे आभार. देव खूप दयाळू आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण करतो. देवाने विरोधकांना सुचविले आणि त्यांनी तो प्रस्ताव आणला हा मी देवाचा आशीर्वाद मानतो. 2018 च्या अविश्वास प्रस्तावादरम्यान मी म्हणालो होतो की ही आमच्यासाठी फ्लोअर टेस्ट नाही तर त्यांच्यासाठी फ्लोअर टेस्ट आहे आणि परिणामी ते निवडणूक हरले.
एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास आमच्यासाठी चांगला आहे. आज मी पाहतो की तुम्ही (विरोधकांनी) ठरवले आहे की लोकांच्या आशीर्वादाने एनडीए आणि भाजप 2024 च्या निवडणुकीत पूर्वीचे सर्व विक्रम मोडून दणदणीत विजय मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही विरोधी पक्षांच्या आचरणाने त्यांच्यासाठी पक्ष देशापेक्षा मोठा असल्याचे सिद्ध झाले आहे. तुम्हाला गरिबांची भूक नाही, सत्तेची भूक तुमच्या मनावर आहे. तुम्हाला तुमच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, देशातील तरुणांच्या भवितव्याची नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, विरोधकांनी अविश्वास प्रस्तावावर नीट चर्चा केली नाही. विरोधकांनी फिल्डिंग लावली, इथून (सरकारच्या बाजूने) चौकार-षटकार मारले. अविश्वास प्रस्तावावर विरोधक नो-बॉल-नो-बॉल करत आहेत. सरकारकडून शतके उभारली जात असताना. मी विरोधी पक्षांना सांगू इच्छितो की, जरा मेहनत घेऊन या. तुम्हाला 2018 मध्ये सांगण्यात आले होते की तुम्ही खूप मेहनत करून याल पण पाच वर्षातही काहीही बदलले नाही.
विरोधकांनी देशाला निराशेशिवाय काहीही दिलेले नाही. ज्यांची स्वतःची खाती खराब झाली आहेत, ते आमच्याकडेही हिशेब मागत आहेत, असा टोला पंतप्रधानांनी विरोधकांना लगावला आहे. घरात काही चांगले घडले की काळा टिका लावला जातो. आज देशाचे कौतुक होत आहे, तुम्ही संसदेत काळे कपडे घालून देशाला काळा टीका लावण्याचे काम करत आहेत, असाही निशाणा पंतप्रधानांनी विरोधकांना लगावला आहे.