'भ्रष्ट', 'हुकूमशाही' शब्दांवर संसदेत असणार बंदी; विरोधक म्हणाले...
लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द 2021 प्रमाणेच शब्द आणि वाक्प्रचारांची यादी तयार केली आहे. आणि ती सर्व खासदारांना पाठवण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार गद्दार, शकुनी, भ्रष्ट, जुमलाजीवी, अराजकतावादी, हुकूमशाही, हुकूमशाह, विनाश पुरूष, बालबुध्दी, नौटंकी, बहिरी सरकार, गिरगिट, लॉलीपॉप, काळा बाजार, घोडेबाजार, दलाल, विश्वासघात यांसारख्या अनेक शब्द आणि वाक्प्रचारांवर बंदी घालण्यात आली आहे. यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले की, संसदेचे अधिवेशन काही दिवसांत सुरू होणार आहे. आता संसदेत भाषण करताना हे मूळ शब्द वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. लज्जास्पद, शिवीगाळ, फसवणूक, भ्रष्ट, दांभिक, अक्षम मी हे शब्द वापरेन. हवे तर मला निलंबित करा. मी लोकशाहीसाठी लढणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हंटले की, मोदी सरकारचे वास्तव सांगण्यासाठी विरोधकांनी वापरलेले सर्व शब्द आता 'असंसदीय' मानले जाणार. आता पुढे काय विषगुरु?
लोकसभेच्या कामकाजाच्या कार्यपद्धती आणि वर्तनाच्या नियम 380 नुसार, चर्चेदरम्यान अपमानास्पद किंवा असंसदीय किंवा असभ्य किंवा असंवेदनशील शब्द वापरण्यात आल्यास सभापतींच्या आदेशाने रेकॉर्ड किंवा कार्यवाहीतून काढले जातात.
दरम्यान, संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधी दरम्यान होण्याची शक्यता आहे.