'PM मोदी ठरवूनही मला संपवू शकत नाहीत' विधानावर पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण; म्हणाल्या...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील विधानावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे मंगळवारी चांगल्याच चर्चेत होत्या. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर आता पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. पूर्ण भाषण ऐका मतितार्थ लक्षात येईल, असे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले आहे.
पंतप्रधान मोदींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत, असे विधान पंकजा मुंडे यानी केले होते. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात आले. समाजातील "बुद्धीजीवी लोकांसोबत संवाद" या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यावर आज पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण देत आपल्या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच, मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या मुद्द्यांमधील आपल्यापर्यंत एक ओळ आली आहे. सनसनीखेज बातम्यातून जमले तर हेही पहा. मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे धन्यवाद, असे त्यांनी म्हंटले आहे.
काय आहे पंकजा मुंडे यांचे भाषण?
पंतप्रधान मोदी पहिल्यांदा आमदार झाले आणि मुख्यमंत्री बनले. पहिल्यांदा खासदार झाले. आणि पंतप्रधान बनले. दुसऱ्यांदा ऐतिहासिक बहुमताने निवडून आणले. प्रयत्नामध्ये सातत्य असणे महत्वाचे आहे. विश्वामध्ये एक वेगळे वलय असणारा पंतप्रधान मोदींसारखा आपल्याला लाभलाय. ही निवडणूक लढताना आपण काहीतरी वेगळ्या पध्दतीने निवडणूक लढवू. ही निवडणूक लढताना आपण पारंपारिक पध्दतीने न लढता वेगळ्या पध्दतीने लढवू. म्हणजे ही मुले जात-पात, पैशांच्या पलिकडे जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण, मला कोणीही संपवू शकत नाही. मोदींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केले, असे त्यांनी भाषणात म्हंटले होते.