पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं, प्रीतम मुंडेंनी व्यक्त केली बहिणीसाठी इच्छा
राज्यात अभूतपूर्व गोंधळानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. सरकार स्थापन झाल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. मात्र, पहिल्या विस्तारात मोजक्याच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. कालच शिंदे सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. परंतु, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याचे समोर येत होते. त्यावरच आता पंकजा मुंडे यांच्या बहीण आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.
मंत्रिमंडळात स्थान मिळावे जनतेची इच्छा
पंकजा मुंडे यांच्या मंत्री पदाबाबत पहिल्यांदा प्रीतम मुंडे यांनी वक्तव्य केलं आहे. आपल्या मनातील इच्छा त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. त्या म्हणाल्या की, पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळावे जशी जनतेची इच्छा आहे. हीच इच्छा माझी देखील आहे, असे विधान प्रीतम मुंडे यांनी केले. हे केल्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे.
दसरा मेळाव्याला नव्याने गर्दीचा विक्रम होईल
पंकजाताई यांनी आव्हान करायचं आणि लोकांनी भरभरून साद द्यायचं हे समीकरण नाही. लोक उत्स्फूर्तपणे दसरा मेळाव्याला येतात. यावर्षी नव्याने गर्दीचा विक्रम होईल ही अपेक्षा आहे. दसरा मेळावा हा भगवान भक्ती गडावर होणार आहे. पंकजा मुंडे ह्या दरवर्षीप्रमाणे सावरगाव येथे समाजाला संबोधित करतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.