स्वतंत्र मराठवड्याबद्दल पंकजा मुंडे भडकल्या, ते लोक कोण...
विकास माने | बीड : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठवाडा आणि विदर्भ राज्याची मागणी केली आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी त्यांनी शुक्रवारी उस्मानाबादमध्ये परिषदही घेतली. याचा संभाजी ब्रिगेड व विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सदावर्तेंची कानउघडणी केली आहे. त्यांचे संविधानिक आणि राजकीय योगदान काय आहे, असा प्रश्न विचारत मुंडे चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या.
गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली होती. यावरच आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. वेगळ्या मराठवाड्याची मागणी करणारे नेमके कोण आहेत? त्यांना संविधानिक आणि राजकीय योगदान आहे का? असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला. हे विषय मांडणारे नेमके कोण आहेत. त्यांचा काही यावर अभ्यास आहे का? असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांचे पंकजा मुंडेंनी कान टोचले आहेत. दरम्यान शिंदे सरकार मधील मंत्री आणि आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहे. यावर बोलणं मात्र पंकजा मुंडे यांनी टाळल आहे.
दरम्यान, स्वतंत्र मराठवाड्याविषयी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला सदावर्ते संबोधित करताना असतानाच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. व काही कार्यकर्त्यांनी सदावर्ते त्यांच्यावर शाईफेक केली. सदावर्ते म्हणजे भाजपचं पिल्लू आहे. महाराष्ट्र तोडायचा असं भाजपने ठरवलेलं आहे. पण आम्ही ते होऊ देणार नसल्याचेही सोमनाथ राऊत यांनी म्हटले आहे.