पंडित नेहरूंच्या चुकीमुळेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु; मुनगंटीवारांचा दावा
उदय चक्रधर | गोंदिया : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्राला डिवचत आहे. अशातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वादग्रस्त सीमाभागावर मोठे विधान केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु झाल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार सध्या गोंदिया दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. पंडित नेहरू यांनी महाराष्ट्रातील मराठी भाषिक गावे कर्नाटकच्या घशात घातले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या सीमावादाचा प्रश्न आता सुप्रीम कोर्टात आहे. हा सीमा वादाचा प्रश्न आम्हीच जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री आम्हाला इशारा देत असतील तर त्यांचा इशारा धुडकून लावू, असेही मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तवय केल्याने राज्यभरातून त्यांच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहे. तसेच, राजकीय वर्तुळातूनही चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यावरही सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. महात्मा फुले यांच्याबद्दल जे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा दुष्पप्रसार करण्यात आला आहे, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच, कोरोना पाप केल्याने होतोय का? मग उद्धव ठाकरेंनीसुद्धा पाप केले. त्यामुळे त्यांना कोरोना झाला होता, असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल मिडियावर ट्विट करुन थेट अमित शहांना आव्हान दिलं आहे. बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने याआधीही असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आमची बाजू भक्कम आहे. सीमावादावर आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.