यंदाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार? विरोधकांचा चहापाण्यावर बहिष्कार
मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच 17 जुलैपासून सुरू होत आहे. विधीमंडळाचे हे हिवाळी अधिवेशन 17 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र, अधिवेशन सुरू होण्याआधीच विरोधक आक्रमक होत एकवटले आहेत. विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान मधल्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडीवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. मात्र, अधिवेशनात विरोधक कोणत्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार? सरकार त्याला कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या आधल्या दिवशी आज विरोधी पक्षांनी बैठक बोलावली. या बैठकीला विरोधी पक्षाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, चहापानाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण, हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार कलंकित आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, सपा आणि कम्युनिस्ट या सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित बैठक घेतली. घटनाबाह्य सरकारच्या चहापानावर आम्हाला कोणतंही स्वारस्य नाही. सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घातला आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.