शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात विरोधकांनी फोडले फटाके; राहुल गांधी संतापले
संदीप शुक्ला | बुलढाणा : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची शनिवारी भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात होती. परंतु, या यात्रेत एक विचित्र प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांना श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात विरोधकांनी फटाके फोडले. यामुळे राहुल गांधी प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले.
बुलढाणा या ठिकाणी भास्तन गावात तीन कृषी कायदे परत घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं. त्यामध्ये तब्बल 733 शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला होता. या 733 शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता भाव दाखवण्यासाठी जळगाव जामोद तालुक्यात भास्तन येथे शेतकऱ्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मात्र, राहुल गांधी श्रद्धांजलीसाठी उभे राहताच विरोधकांनी फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली. यावेळी तात्काळ निवेदकाकडून फटाक्यांची आतिषबाजी हा नियोजित कार्यक्रमातील प्रकार नसल्याचे सांगत पोलिसांना फटाक्यांची आतिषबाजी करणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली व या आतिषबाजीचा निषेध करण्यात आला. यावेळी राहुल गांधीसुद्धा घडलेल्या या प्रकारामुळे विरोधकांवर चांगलेच चिडल्याचे पाहायला मिळालं.
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे तेलंगणा मधून महाराष्ट्रात दाखल झाली. व राज्यातील नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जिल्ह्यातून मार्गक्रमण करत 20 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून आज मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.