मत द्यायचं तर द्या, नाहीतर...; नितीन गडकरींचे वक्तव्य
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. राजकारणात असतानाही नितीन गडकरी अनेकदा निर्भीडपणे मत मांडत असतात. याची प्रचिती याआधीही अनेकदा आली असून नुकतंच पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. राजकारणी मतांसाठी अनेक जुगाड करतात. परंतु, निवडणुकीत मत द्यायचंय तर द्या नाहीतर नका देऊ. लोक मला मत देतात, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.
मुंबईतील अंधेरी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट'च्या दीक्षांत कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी आज उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले, पुढील लोकसभा निवडणुकीत मी कटआउट लावणार नाही. कार्यकर्त्यांना चहापाणी देणार नाही. पोस्टरही लावणार नाही. निवडणुकीत मत द्यायचंय तर द्या नाहीतर नका देऊ, असं म्हंटले तरी लोक मला मत देतात. कारण लोकांना काम करणारी माणसं हवी आहेत, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.
दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी नितीन गडकरी यांना भाजपच्या समितीतून वगळण्यात आले आहे. यामुळे भाजपच्या निर्णयावर गडकरी नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय संन्यासाच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या. परंतु, आजच्या वक्तव्यानं निवडणुकीसाठी ते सज्ज असल्याचे दिसून येत आहे. तसेच, गडकरींच्या वक्तव्याचा रोख भाजपकडे तर नाही ना अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.