सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिपदाच्या शुभेच्छा; कोणी म्हणालं असं?
मुंबई : अजित पवार आमचेच नेते आहेत, असे विधान करुन सुप्रिया सुळे यांच्यापाठोपाठ शरद पवार यांनीही केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रिपदाच्या शुभेच्छा देतो. बारामतीला अजून एक लाल दिवा मिळो अशी मी माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. तसेच, ठाकरे गटावरही जोरदार टीका केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, एका मराठी सिनेमाचा फेमस डायलॉग आहे कुणी घर देता का घर? तशीच अवस्था उद्धव ठाकरे आणि उबाठाची झालेली आहे. आम्ही पहिल्यापासून बोलतोय उबाठा ही मविआची वाय झेड टीम आहे. मोठ्या तावातावाने संजय राजाराम राऊत बोलतात की विरोधकाची आघाडी 2024 ला सत्तेत येणार. अरे 24 दिवस एकत्र राहून दाखवा, असे आव्हानच त्यांनी मविआला दिले आहे.
काही दिवसांपूर्वी सुप्रिया ताईंनी सांगितले आणि आता पवार साहेबानी देखील सांगितले अजित दादा आमचे नेते आहेत. आम्ही जे वारंवार बोलतो महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून मोदींसाहेबांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात जनतेची सेवा करतोय यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. 2024 ला पण मोदी साहेब आणि चांद्रयान 3 ने जी यशस्वी लँडिंग केली त्याचप्रमाणे भारतीय जनेतच्या मनात मोदी यशस्वी लँडिंग करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, शरद पवारांनी आपल्या विधानावर खुलासा केलेला आहे. आमचे नेते अजित पवार आहेत हे मी बोललो नाही. सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. त्याबाबत त्याच सांगू शकतात, अजित पवार आमचे कोणतेही नेते नाहीत. पहाटेच्या वेळी एक संधी दिली. मात्र, ही संधी सारखी द्यायची नाही, आता संधी मागायची नसते आणि मागितली तरी द्यायची नाही ही आमची मनीषा स्पष्ट आहे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.