Nilesh Rane : महाराष्ट्राला घुसमटत ठेवण्यामध्ये पवारांना नेहमीच समाधान मिळालंय
मुंबई : बाबासाहेब पुरंदरेंच्या (Babasaheb Purandare) लिखाणामुळं शिवाजी महाराजांवर जेवढा अन्याय झाला तेवढा कशामुळंच झाला नाही, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी केले होते. यावर आज भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
निलेश राणे म्हणाले की, पवार साहेबांना मधूनच बाबासाहेब पुरंदरे आठवतात. कारण दोन महिने झाले पवार साहेबांनी महाराष्ट्रात कुठलाही वाद लावला नाही. महाराष्ट्राला घुसमटत ठेवण्यामध्ये पवार साहेबांना नेहमीच समाधान मिळालेले आहे, असा थेट आरोपच त्यांनी पवारांवर केला आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणामुळं शिवाजी महाराजांवर जेवढा अन्याय झाला तेवढा कशामुळंच झाला नाही. पुरंदरेंच्या लिखाणामुळं अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचं काम झालं. फक्त आई जिजाऊ याच शिवरायांच्या मार्गदर्शक होत्या, असेही शरद पवार यांनी म्हंटले होते. डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या शिवचरित्र ग्रंथ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.