मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकली आहे. सात तासांपासून कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
निलेश राणे म्हणाले की, आज सकाळी ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी गेले. पत्राचाल प्रकरणात हा माणूस ईडीला सहकार्य करत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना घरात जावे लागले. त्यानंतर घराबाहेर राऊतांचे भाड्याचे लोक धुमाकूळ घालत आहेत. मात्र, पोलिसांचे बांबू पडतील तेव्हा काय होईल, असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.
त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करा. त्यातून काही तरी मार्ग निघू शकेल. पण, तुम्ही सहकार्य केलेच नाही तर पुढची मुलाखत तुमची जेलरबरोबर असेल, अशा शब्दात निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
दरम्यान, संजय राऊत यांच्या भांडुपनंतर कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावरही ईडीने धाडी टाकल्या आहेत. कांजूरमार्ग येथील मैत्री बंगला आणि दादर येथील गार्डन कोर्ट येथील घरावर हा छापा टाकला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून ठिय्या आंदोलन करत आहेत.