धनुष्यबाण कोणाचा? यावर आता 'या' दिवशी होणार सुनावणी
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असा दावा करण्यात आला. यावरच आता शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान, आयोगाने शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतला व ठाकरे गटाला युक्तीवादासाठी 17 जानेवारीची ही तारीख दिली. त्यामुळे सुनावणी 17 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
ठाकरे गटाचा युक्तिवाद
सत्ता संघर्षाबाबत कोर्टचा निकाल येईपर्यंत कोणतीही सुनावणी करू नये असा मुद्दा ठाकरे गटाने मांडला. सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधीच निवडणूक आयोगाने निकाल दिल्यास आयोगाचा निकाल हास्यास्पद ठरेल, असे देखील ठाकरे गटाचे वकील सिब्बल म्हणाले. निवडणूक आयोगाने या सुनावणीतील युक्तिवाद प्राथमिक की अंतिम याचीही स्पष्टता करावी अशी मागणी सिब्बल यांनी केली.
शिंदे गटाचा युक्तिवाद
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घेण्यात आलेले निर्णय, संघटनात्मक बदल हे बेकायदेशीर आहेत. शिवसेनेची जुनी घटना ही बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. शिवसेनेच्या घटनेत कोणताही बदल न करता पक्षप्रमुख म्हणून पद निर्मिती करण्यात आली असल्याचा दावा शिंदे गटाने केला. पक्षप्रमुख म्हणून राहण्याचा अधिकार ठाकरेंकडे नसल्याचा दावा शिंदे गटाने केला.