विधानसभा अध्यक्ष-विधान परिषद उपसभापती आमने-सामने; नार्वेकरांवर गोऱ्हे संतापल्या
मुंबई : विधीमंडळ परिसरात अधिकार कुणाचे चालणार यावरून विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद उपसभापती आमने-सामने आले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवरून उपसभापती नीलम गोऱ्हे चांगल्याच संतापल्या आहेत. विधीमंडळातील कार्यक्रमांबाबत गोऱ्हेंना माहितीच दिली नाही. अध्यक्षांनी उपसभापती यांना विश्वासात घेतलं नाही, असा अन्यायाचा पाढाच नीलम गोऱ्हेंनी परिषदेत वाचला आहे.
काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?
मला थेट पत्र मिळालं की असा कार्यक्रम आहे. नागपूरमध्ये आपण करतो. पण, मुंबईत असा संगीताचा कार्यक्रम कधीच झाला नाही. अध्यक्षांना वाटलं असेल पण मी विरोध केला नाही. पण, माझं मत विचारलं गेलं नाही. हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रच्या अनावरणावेळी देखील शेवटपर्यंत कोणतीच माहिती अध्यक्षांनी दिली नाही. माझी अधिकाऱ्यांवर नाराजी नाही. पण, कुठलं तैलचित्र लागणार हे केवळ अध्यक्ष यांनाच माहित होतं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या कस्टडीत ठेवणं इतके पॉवर अध्यक्ष यांच्याकडे आहेत का, असा खडा सवाल गोऱ्हेंनी यावेळी विचारला आहे.
काय घडत मला निदान कळालं पाहिजे इतकी इच्छा आहे. मला कळलं की अजिंठा बंगला येथे आता 6 व्यक्तींसाठी मोठे क्वार्टरस् बांधले जाणार आहेत. विरोधी पक्ष, सभापती, उपसभापती यांना जागा असणार आहेत. मी विचारलं की बैठक झाली का? तेव्हा गरजेची नाही, अध्यक्षांनी निर्णय घेतला, असं सांगण्यात आलं, असेही त्यांनी बोलून दाखविले आहे.
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. अध्यक्ष श्रेष्ठ की सभापती अशा चर्चा सभागृहात करणं योग्य नाही. सभापती-अध्यक्ष यांनी एकत्र बसावं आणि कोणाचे अधिकार काय आहे हे बसून ठरवावे. इथे मोठा कोण आणि छोटा कोण ही चर्चा होऊ शकत नाही. उपसभापती यांच्या अधिकारांबाबत गटनेत्यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.