'जे घडलं त्याचं उत्तर भविष्य देईल' मनिषा कायंदेंच्या शिवसेना प्रवेशावर गोऱ्हेंची प्रतिक्रिया
रविवारी विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता ठाकरे गटाकडून आता यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आता शिवेसना ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे आज शिवसेनेचा 57 वर्धापन दिन आहे. यावरही त्यांनी यावेळी भाष्य केले.
काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?
मनिषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना नीलम गोऱ्हे यांनी एका वाक्यात उत्तर दिले. त्या म्हणाल्या, आजपर्यंत बऱ्याच वेळा शिवसेनेमध्ये चढ-उतार झालेले आहेत. अनेकांनी नवीन पक्ष काढले. अनेक जण दुसऱ्या पक्षात गेले. पण शिवसेनेला आव्हान द्यायचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. राजकीय मतभेद हे अनेक पक्षांमध्ये होतात. काँग्रेसच्या देखील दोन काँग्रेस झाल्या होत्या. आत्ता जे घडलं त्याचं उत्तर भविष्य देईल जनता ठरवेल की कोणी योग्य वळणावर आहे. असे देखील त्या म्हणाल्या.
पुढे त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबच्या कबरीला दिलेल्या भेटीवर देखील भाष्य केले. प्रकाश आंबेडकर यांना औरंगजेबाच्या थडग्यावर जायची सवय आहे. ते पूर्वी सुध्दा बऱ्याच वेळेला गेले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सोबतच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या टीकेवर देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी कुणाला शंभर टक्के वेळ देऊ शकत नसतो. म्हणून कदाचित उद्धवजी आमदारांना भेटले नसतील. त्यांची राजकीय मतभेद काय आहेत हे महत्त्वाचं आहे. व्यक्तिगत टीकेपेक्षा राजकीय मतभेद मांडा. बऱ्याच वेळेला हे लोक सोयीनुसार वैयक्तिक टीका करत असतात, असं उत्तर त्यांनी दिले.