श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; आरोपीस कठोरात कठोर...
मुंबई : दिल्लीतील तरुणीच्या हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. वसईतील श्रध्दा वालकर तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. या प्रकरणावर आज राष्ट्रवादी कॉंग्रसेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे अतिशय दुर्दैवी व संतापजनक आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिच्या मारेकऱ्यास कठोरात कठोर शासन होणे आवश्यक आहे. माझी तपास यंत्रणांना विनंती आहे की याप्रकरणी कसून तपास करावा. या नराधमास कायद्याच्या चौकटीत सर्वाधिक कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या घटनेत प्राण गमावावे लागलेल्या श्रद्धाला न्याय मिळणे आवश्यक आहे. श्रद्धाला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना सुळे यांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.
काय आहे नेमके श्रध्दा वालकर प्रकरण?
मुळची वसईतील श्रद्धा वालकर आणि तिचा प्रियकर आफताब दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. परंतु, काही दिवसांमध्येच दोघांमध्ये भांडण सुरु झाले. या दरम्यान आफताब याने १८ मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली व तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून दररोज एक एक तुकडा जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे.