सुप्रिया सुळेंचा शिंदे- फडणवीस सरकार निशाणा; म्हणाल्या, दोनच लोक सगळे निर्णय...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध कुठल्या ना कुठल्या कारणाने चालूच असते. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे गेल्या होत्या. त्याठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, मंत्रीमंडळ आहे कशासाठी? दोनच लोक सगळे निर्णय घेणार असतील तर मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी करायचे तरी काय? सगळ्यात मोठी अडचण आहे की आज सर्वसामान्य मायबाप जनतेने न्याय मागायला कोणाकडे जायचे? त्यांना जर अडचण आली तर त्यांनी कुणाकडे जायचे? जिल्हापरिषदेची निवडणूक झाली नाही आणि महानगरपालिकांचेही निवडणूक झाली नाही. ईडी सरकार येऊन सहा महिने झाले आहेत, मग हे निवडणुका का घेत नाहीत? त्यांना कशाची भीती आहे निवडणूक घ्यायला? असे सवाल करत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पार्टीमध्ये नक्कीच खूप कर्तृत्वान महिला आहेत आमदार म्हणून किंवा आमदार नसल्या तरी संघटनेत तरी आहेतच ना? मात्र यांना(भाजपाला) महिलांबद्दल मनात आदर नाही किंवा प्रेम, आस्था नाही, हे त्यांच्या कृतीमधून दिसते आहे. अशीही टीका त्यांनी भाजपावर केली.