धर्मवीर की स्वराज्यरक्षक? शरद पवार म्हणाले...
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. याविरोधात भाजपने राज्यभरात आंदोलने करत आहेत. यावर आता पहिल्यांदाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचे असेल तर धर्मवीर म्हणा अन्यथा स्वराज्यरक्षक म्हणा. मला काळजी अशी वाटते की, मी ठाण्याला जेव्हा जातो तेव्हा धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय?
एखाद्या व्यक्तीची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो. आरएसएसचे जुने प्रमुख आणि सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल लिखाण केलं आहे. ते उकरून काढून राज्यातील वातावरण खराब करू इच्छित नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर हल्ले होत असताना संभाजी महाराजांनी राज्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम केले. याची नोंद सर्वांनी घेतली पाहिजे. म्हणून त्यावर वाद घालण्याचे कारण नाही. अजित पवार लवकरच माध्यमांसमोर येतील, असे शरद पवार यांनी म्हणत वादावर पडदा टाकावा, असे आवाहन केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या औरंगजेब क्रूर नव्हता, या विधानाबद्दल शरद पवार यांनी विचारले असता ते म्हणाले, मी आव्हाड यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. अजित पवार यांचे वक्तव्य मी टीव्हीवर पाहिले होते, म्हणून त्यावर प्रतिक्रिया देत आहे. आता कुणी आमदार बोलत असतील त्या प्रत्येकावर मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले.
दरम्यान, लव्ह जिहाद विरोधात मोर्चे कोण काढते तर भाजपचे लोक समोर दिसत आहेत. देशात आणि राज्यात सत्ता त्यांची आहे त्यांनी कायदा करावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.