दाऊदशी संबंध तर तुम्ही तिच्याशी संबंध कसे काय ठेवले? रुपाली ठोंबरेंचा शेवाळेंना सवाल
राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियन प्रकारणावरून आदित्य ठाकरेंवर आरोप केले होते. त्यामुळे राज्यात राजकारण एकदम तापले होते. त्यातच शिंदेगटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर शोषणाचे आरोप करण्यात आले. ठाकरे गटाने शेवाळे यांच्यावर हे आरोप केलेत. त्यानंतर शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत सगळे आरोप फेटाळून लावलेत. सोबतच यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचे देखील आरोप त्यांनी यावेळी केले. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा दाऊदशी संबंध नाही. पण जर शेवाळे तसा आरोप करत असतील तर शेवाळेंनी देशाच्या विरोधात काम केलं, असा त्यांच्या विधानाचा अर्थ घेत शेवाळेंवरच कारवाई व्हायला पाहिजे, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.
पुढे त्या म्हणाल्या की, आदित्य ठाकरेंनी तुम्हाला विवाहबाह्य संबंध ठेवा, असं सांगितलं नव्हतं. आता प्रकरण थांबवण्यासाठी दाऊदचं नाव घेत आहेत. जर तुम्ही म्हणता त्या महिलेचे दाऊदशी संबंध आहेत, असं म्हणता तर मग तुम्ही तिच्याशी संबंध कसे काय ठेवले?, असा सवालही रुपाली पाटील यांनी शेवाळेंना केला आहे.