पाटलांच्या विधानाचा रोहित पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, वैचारीक दिवाळखोरीचंच दर्शन....
राज्यात अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. त्यातच राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान त्यासोबतच अनेक भाजपच्या नेत्यांनी देखील वादग्रस्त विधान केले होते. हा वाद अद्यापही शांत झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा वातावरण तापले. त्यावरूनच आता राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
आपल्या वैचारीक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं!
रोहित पवार ट्विट करून म्हणाले की, भीक आणि त्याग-मेहनत यातला फरक समजून न घेता फुले-आंबेडकरांनी समाजासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानावर भिकेचा शिक्का मारत त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न दादांनी केलाय. पण यामुळे महत्त्व कमी होणार नाहीच, पण असं बोलून त्यांनी आपल्या वैचारीक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं! अशा शब्दात पवार यांनी समाचार घेतला आहे. पुढे ते म्हणाले की, समाजातील मूलभूत प्रश्नाकडं दुर्लक्ष करण्यासाठी सातत्याने राज्यातील थोर व्यक्तीबाबत भाजपचे लोक कुत्सितपणे बोलत असतील तर ते युवांच्या भवितव्याचं वाटोळं आणि बौद्धिक नुकसानही करत आहेत, याचा सर्वांनीच विचार करायला हवा. असे रोहित पवार ट्विटच्या माध्यमातून म्हणाले आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पैठण येथील कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या केल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. असं म्हणताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातलं मफलर पुढे केले. ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे. असे चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.