राज ठाकरे-फडणवीस महाराष्ट्राची फसवणूक करताहेत; कुणी केली टीका?
मुंबई : टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यानंतर काल राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंनी मोठे निर्णय घेतले आहेत. चार मिनीटांपेक्षा अधिक एकही गाडी टोल नाक्यावर थांबणार नाही, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांचे नुकतेच झालेल 'टोल मुक्त आंदोलन' म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी "तू मारल्या सारखं कर, मी रडल्या सारखं करतो" करार, अशी टीका क्लाईड क्रास्टोंनी केली आहे. तसेच, स्क्रिप्ट लिहिल्याप्रमाणे बोलणे आणि वागणे, महाराष्ट्राच्या लोकांची फसवणूक दोघेही करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
ठाण्यातील 5 एन्ट्री पॉईंट्सवर टोल वाढविण्यात आले, अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्य केले की चारचाकी आणि तीन चाकी वाहनांना टोल नाही. लोकांना वाटलं की आम्हाला फसवलं जाताय की काय? टोल घेणार असाल तर तुम्ही कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्स वर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील आणि किती गाड्या या टोल वरून जातात हे कळेल ही व्हिडिओग्राफी उद्यापासून सुरू होईल, असेही राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.