त्याचे हाणूनी थोबाड फोडा, रामदेव बाबांच्या विधानावर मिटकरींची विखारी टीका
राज्यात एकीकडे वादग्रस्त विधानांवरून रान पेटलेले असताना दुसरीकडे वादग्रस्त विधानाचे सत्र चालूच आहे. या विधानांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलेली असताना अशातच आज ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. रामदेव बाबांच्या या विधानाचे आता पडसाद दिसायला सुरुवात झाली आहे. रामदेव बाबांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरून रामदेव बाबांवर विखारी टीका केली आहे.
काय आहे मिटकरी यांच्या ट्विटमध्ये?
रामदेव बाबांच्या वादग्रस्त विधानावर अमोल मिटकरी यांनी संत तुकाराम यांच्या अभंगांच्या ओळींचा संदर्भ घेत रामदेव बाबांवर टीका केली. ते म्हणाले की, कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा ? महाराष्ट्रात तुकोबा ते गाडगेबाबा अशी संतांची सुसंस्कृत परंपरा आहे. आज रामदेव बाबांनी स्त्रियांचा अपमान करून या परंपरेला तडा दिला आहे . "छाटी भगवी मानसी ! व्यर्थ म्हणे मी संन्यासी !तुका म्हणे तोचि वेडाl त्याचे हाणूनी थोबाड फोडा ll असे ट्विट त्यांनी शेअर केले आहे.
काय म्हणाले होते रामदेव बाबा?
ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. ते म्हणाले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा बोलले होते.