मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, मुलाच्या वयाच्या...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. तर राजकीय मंडळींमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु असताना त्यातच आता राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडत आहे. दरम्यान, अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळत आहे. मात्र, आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत त्याच्या काही विधानाचा संदर्भही यावेळी दिला. त्यावरच आता विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला उत्तर देताना पवार म्हणाले की, राज्याच्या कुठल्याही विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांसाठी महत्त्वाचा असतो. त्याला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उत्तर देतात. सहा महिन्यांपूर्वी काय झालं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याला आज सहा महिने झाले. मी सभागृहात ३२ वर्षांपासून येतो. आधीही मी इतरांची भाषणं ऐकायचो. शरद पवारांनीही ७८ साली पुलोद स्थापन केलं. तेव्हा अनेक मान्यवर त्या मंत्रीमंडळात होते. पण कधीही मुख्यमंत्र्यांची भाषणं ही राजकीय होत नाहीत. एखाद-दुसरा चिमटा काढला, मी समजू शकतो. असं मत अजित पवार मांडले.
पुढे ते म्हणाले, तरुणांना वाटतंय काम कसं मिळणार आहे. महागाई कशी कमी होईल. शेतकऱ्यांबाबत काय भूमिका घेतली जाणार. तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करत आहात. जाऊ द्या ना, मुलं आहेत म्हणून सोडून द्या ना. दुसऱ्या कार्यकर्त्यांना, प्रवक्ते म्हणून बोलू द्या. नरेंद्र मोदींशी, अमित शाहा यांच्याशी तुमचे चांगले संबंध झालेत. तिथून राज्यासाठी अजून काय चांगलं आणता येईल हे बघा. राज्याच्या हितासाठी दिल्लीत जा. पण तुम्ही त्यावर बोलत नाहीत. असे अजित पवार यावेळी म्हणाले.