'हे सहन करणार नाही' अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या विषयावरून प्रचंड गदारोळ सुरु झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांकडून या प्रकरणाचा निषेध नोंदवला जात होता. यावरूनच आता पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
आपल्या नागरिकांसोबत काहीही चुकीचं घडलं असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु उगीचच विरोधकांना त्रास देण्यासाठी जर कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर तो कुणीही सहन करणार नाही. याआधी अशाचप्रकारे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले. त्यामुळे त्यांनी अतिशय त्रासून राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. परंतु त्यानंतर शरद पवारांनी त्यांना समजावून सांगितले. मी आणि जयंत पाटीलही आव्हाडांना भेटायला गेलो. त्यातून आम्ही मार्ग काढला. जाणीवपूर्वक कुणाला गोवण्याचा किंवा अडकवण्याचा प्रयत्न केला किंवा राजकीय विरोधक आहेत, म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष म्हणून आम्हीही हे सहन करणार नाही. असा इशारा अजित पवारांनी यावेळी दिला.