आव्हाडांनी राजीनामा द्यावा का याबाबत शरद पवार यांचा शेवटचा निर्णय असेल- अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या विनयभंगाच्या आरोपांमुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यामुळे आमदार आव्हाड यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. आव्हाडांच्या अश्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाण्यात येऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांच्यापाठोपाठ विरोधा पक्षनेते अजित पवार हे सुद्धा पुण्याहून जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीसाठी ठाण्यात दाखल झाले. याच भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
आव्हाडांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, व्हिडिओमध्ये कुठेही विनयभंग झाल्याचं दिसत नाहीय. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे नाराज होऊन राजीनामा दिलाय. जितेंद्र आव्हाडांवर 72 तासांत दोन गुन्हे दाखल केले. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे.या प्रकरणाचा सूत्रधार कोण ते समोर येईलच. खरंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात हे षडयंत्र आहे. पोलीसही दबावाखाली वागत आहेत. परंतु आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या पाठिशी आहोत. असे अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दैवत मानतात. त्यांनी राजीनामा द्यावा का याबाबत शरद पवार यांचा शेवटचा निर्णय असेल. तोच निर्णय जितेंद्र आव्हाड मान्य करतील, त्यांना पटो किंवा नको, साहेबांचा शब्द म्हणून ते मान्य करतील”, अशी रोखठोक भूमिका अजित पवार यांनी मांडली. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, असा आग्रह अजित पवार यांनी केला आहे.