थोरातांच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, फोन केला...
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीपासून राज्यातील काँग्रेसमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला. आधी त्याठिकाणी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली त्यामुळे एकच गदारोळ निर्माण झाला. तेथील विजयी उमेदवार सत्यजित तांबेंनी नंतर थेट महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केले. त्यानंतर सत्यजीत तांबे यांची बाजू घेत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं. मात्र, आज त्यांनी थेट काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसमधला अंर्तगत वाद आता चव्हाट्यावर आलाय. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला अशी बातमी पाहिली. त्यांना मी आज वाढदिवसानिमित्त फोन केला होता. त्यावेळी मी म्हटलो की, बाळासाहेब आज तुमचा वाढदिवस आहे. आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं या शुभेच्छा. मात्र, एक बातमी आहे आणि त्याविषयी आज तुम्हाला विचारावं की नको हे मला कळत नाही. कारण आज तुम्ही कामात असाल. त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, दादा, मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेईन. अशी सविस्तर माहिती अजित पवारांनी माध्यमांना दिली.