'अपघाती मृत्यू झाला की आमच्या गावात म्हणतात, ‘देवेंद्र’वासी झाला' - शरद पवार
बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला. बसचा अपघात झाल्यानंतर बसने ताबडतोब पेट घेतला यावेळी बसमधील 25 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोकाकळा पसरली आहे. या अपघातावर राजकीय प्रतिक्रिया असताना आता या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली.
काय म्हणाले शरद पवार?
बुलढाणा अपघातावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. २५ लोकांचा बळी जाणं ही बाब वेदना देणारी आहे. कदाचित शास्त्रीय दृष्ट्या नियोजन केलेले नसेल. त्याचा दुष्परिणाम असा आहे लोक मृत्यू होत आहेत. आमच्या गावात अशी चर्चा आहे की एखाद, दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात देवेंद्रवासी झाला. हा महामार्ग करण्याच्या काळात, नियोजन आखण्यात ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांना लोक दोषी ठरवतात. असे पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, 'आम्ही एकच गोष्ट ऐकतोय. अपघात झाला राज्य सरकारने पाच लाख रुपये दिले. पाच लाख रुपये मोजून हे प्रश्न सुटणार नाही. यासंदर्भात या देशात रस्ते-त्यांचे नियोजन यांचे ज्ञान असणारे कर्तबगार लोक आहेत त्यांची टीम तयार करावी. कुठे चूक झाली आहे कशामुळे चूक झाली आहे ते तपासलं गेले पाहिजे. अपघातांची स्थिती, वाढते अपघात हे थांबतील कसे हे बघायला हवं. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे. असा सल्ला त्यांनी सरकारला दिला.