शिंदेंनाच धनुष्यबाण चिन्ह मिळावं; राणा दाम्पत्याने घातले अंबादेवीला साकडे
सूरज दहाट | अमरावती : विदर्भाच कुलदैवत व अमरावतीच्या अंबादेवी व एकवीरा देवीचं खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दर्शन घेतलं. यावेळी राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी अंबादेवीकडे साकडे घातलं असल्याची प्रतिक्रिया नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दिली.
हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी राणा दाम्पत्याने आज पदयात्रा केली. गंगा सावित्री निवासस्थानापासून अंबादेवी मंदिरापर्यंत राणा दाम्पत्य जवळपास २ किलोमीटरपर्यंत चालत गेले. व अंबादेवीचं दर्शन घेतले. यानंतर राणा दाम्पत्याने उध्दव ठाकरेंवर टीका केली. खरी बाळासाहेबांची शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचीच आहे. एकनाथ शिंदेचे खरे बाळासाहेबांचे वारस आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे. तर, शिंदे यांनाच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी अंबादेवीकडे साकडे घातलं असल्याचेही नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना कुणाची यावरुन उध्दव ठाकरे व शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगही अॅक्शन मोडवर आले आहे. निवडणूक आयोगाने आता शिवसेनेला आपली भूमिका मांडण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीआधीच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निकाल लागण्याची शक्यता आहे.