...नाहीतर तुमचाही संजय राऊत होईल; शिंदे गटाचा मिटकरींना इशारा
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केले होते. अजित पवार लवकरच मुख्यमंत्री बनण्याचे संकेत मिटकरींनी ट्विटरद्वारे दिले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पलटवार केला आहे. आपण या युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नका. नाहीतर तुमचाही संजय राऊत होईल, असा इशाराच नरेश म्हस्के यांनी अमोल मिटकरींना दिला आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार व्हायचंय कदाचित मंत्रीपदामध्ये आपला नंबर लागेल. मिटकरींनी अजित दादांवर प्रेम दाखवण्याकरिता हे उद्गार केले असतील. त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी देखील अशा प्रकारचे वक्तव्य केले होतं आणि नंतर माफी मागितली होती. मिटकरींनी मुख्यमंत्री पदाची चिंता करू नये.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तिघेजण एकत्र खूप उत्तमरित्या महाराष्ट्रातील विकासाचे काम करत आहेत. आपण या युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नका. नाहीतर तुमचाही संजय राऊत होईल. संजय राऊत यांनी केलं ते तुम्ही करू नका. आपला संजय राऊत होऊ नये याची आपण काळजी घ्यावी, असे म्हणत त्यांनी मिटकरी आणि संजय राऊत दोघांवर निशाणा साधला आहे.
तसेच, आम्हाला सुद्धा बोलता येतं पण आपण युतीमध्ये आहोत त्यामुळे आम्ही शिस्त पाळतोय संयम बाळगतोय, असेही म्हस्केंनी म्हंटले आहे.
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री पदाबबात भाष्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......, असे ट्विट त्यांनी केले होते. तर, लवकरच अजितपर्व, असेही अमोल मिटकरींनी म्हंटले होते. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.