सिंधुदुर्ग : राज्यसभेच्या निवडणूक (Rajya Sabha Election) निकालानंतर शिवसेनेवर (Shivsena) टीका करण्याची एकही संधी विरोधी पक्ष सोडत नाही आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
नारायण राणे म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीच्या निकालानं मख्यमंत्र्यांची नाचक्की झाली. बढाया मारणारे स्वत:चे आमदारही वाचवू शकले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे त्यांनी नैतिकता बाळगून आपल्या मुख्यमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा देऊन बाजूला व्हावे, अशी जोरदार टीका राणे यांनी केली आहे.
तर संजय राऊत काठावर निवडून आले असून राऊत आमच्या हातातून थोडक्यात वाचले, असेही राणे म्हणाले आहेत.
संजय राऊतांच्या विधानाचा समाचार घेताना नारायण राणे म्हणाले, हातात ईडी येण्यासाठी केंद्रात सत्ता यावी लागते, तुम्हाला राज्यसभेचा आमदार निवडून आणता येत नाही, असा प्रहार करून राणेंनी पुढे शिवसेनेचे सहा खासदारही निवडून येणार नाहीत, असा घणाघात केला आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत शिवसेनेला भाजपने धोबीपछाड दिला आहे. धनंजय महाडिक यांना ४१.५८ तर संजय पवार यांना ३९.२६ मते मिळाली. त्यामुळे दोघांमध्ये अडीच मतांचा फरक होता. संजय पवार यांच्या पराभवामुळे शिवसेनेला मोठा दणका बसला आहे. तर, संजय राऊतांना 41 मतं मिळाली आहेत.