संजय राऊत आणि उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये, म्हणूनच...; नारायण राणेंचा घणाघात
पुणे : शिंदे सरकारचा पोपट मेला आहे. ते केवळ जाहीर करणं बाकी आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत यांना काय काम आहे का? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणी असो. त्यांचं एक स्टेटस आहे. त्याला कोणी अपशब्द बोलू नये. सत्ता गेल्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये आहेत. म्हणून वेड्यासारखे बडबडत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.
नारायण राणे म्हणाले की, देशात प्रत्येक तरुणाला रोजगार दिला जात आहे. आत्मनिर्भर बनण्यासाठी तरुणांनी योगदान द्यावं. यातून हा उपक्रम सुरू केला आहे. आज अर्थव्यवस्थेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. उद्धव ठाकरे रिकामा टेकडा माणूस. अडीच वर्षात यांनी तरुणांना नोकरी दिली नाही. अडीच वर्षात फक्त दोन तास मंत्रालयात गेला, अशी टीका त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे हे फार दुःखात आहेत. त्यांना सहन होत नाही म्हणून उध्दव ठाकरेंना दुःखातून सावरण्यासाठी भेटायला येत आहेत. पण, या सगळ्यांचे मिळून 60 खासदारही होत नाहीत. मराठीत एक म्हण आहे एक ना धड बाराभर चिंध्या, असा निशाणा त्यांनी नितेश कुमार आणि उध्दव ठाकरेंच्या भेटीवर साधला आहे.
तर, रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना नारायणा राणेंनी उध्दव ठाकरेंवर आरोप केला आहे. कोळशापासून वीज बनवणारे 34 उत्पादक उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर भेटले. त्यांनी जैतापूर प्रकल्पाला विरोध केला म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यावेळी विरोध दर्शवला आताही तेच करत आहे. सुपारी घेऊन विरोध आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, आपला पराभव होऊ शकत नाही या विचाराचा पराभव, अशी टीका राज ठाकरेंनी कर्नाटक निकालावरून भाजपवर केली होती. यालाही नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांचे एकूण किती जण आमदार-खासदार आहेत? अशा लोकांनी भाष्य करताना विचार करावा. आमचे 300 च्या वर खासदार आहेत. महाराष्ट्रात स्वतःचे 105 आमदार आहेत, असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला.