संजय राऊत मानसिक रुग्ण; नारायण राणेंचा घणाघात
प्रशांत जव्हेरी | नंदुरबार : विकसित भारत संकल्पना यात्रेच्या आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राणे यांनी यावेळी माध्यमाची संवाद साधत संजय राऊत, आदित्य ठाकरे यासह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्हिडिओ ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत हा मानसिक रुग्ण असून तो डिप्रेशनमध्ये आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर न बोललेलेच बरे. संजय राऊत यांनी कधी जनहिताचे प्रश्न उपस्थित केले आहेत का? असा टोलाही राणे यांनी लगावला आहे.
कोकण दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे 16 चे 160 आमदार होतील, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत नारायण राणे म्हणाले की, सोबत असलेले 16 चे 10 होऊ नयेत याची काळजी घ्यावी. ठाकरे परिवाराकडे नवीन आमदार निवडून आणण्याची क्षमता नसून ते कशाच्या आधारावर बोलता हा ही एक मोठा प्रश्न असल्याचा निशाणा त्यांनी साधला आहे.
दरम्यान, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण द्यावे. मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण द्यावे या मताचा मी असून घटनेला धरूनच आरक्षण दिले जाईल. कुणबी नोंद संदर्भात निर्णय घ्यायला. राज्य सरकार सक्षम असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. मराठा समाजाला वेगळं आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचेही नारायण राणेंनी स्पष्ट केलं.