महाविकास आघाडी सरकारबद्दल सुधीर मुनगंटीवार यांच्याशी नारायण राणे असहमत!
राज्यातील महाविकास आघाडी सरकार फार काळ चालणार नाही, ते पडणार असल्याचे भाजपा नेते अनेकदा सांगतात. यात सर्वात आघाडीवर आहेत ते भाजपाचे खासदार नारायण राणे. आता त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकार टिकण्याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी असहमती दर्शविली आहे.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून भाजपाचे खासदार नारायण राणे हे सातत्याने सरकार पडणार असल्याचे भाकीत करीत होते. मात्र, ते भाकीत कायम फोल ठरत असल्याने त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने तशी अपेक्षा ठेवली होती. कोकणात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाला येणाऱ्या अमित शहांच्या पायगुणांनी राज्यातील ठाकरे सरकार जावो, अशी इच्छा त्यांनी केली होती.
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आघाडी सरकार जास्तीत जास्त तीन महिने टिकेल आणि नंतर भाजपाची सत्ता येईल, असे म्हटले होते. त्याबद्दल नारायण राणे यांनी अहसमती दर्शवली आहे. ते म्हणाले, कायदा-सुव्यवस्था नसलेले, सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेची काळजी नसलेले हे सरकार एक दिवस राहू नये. त्या सरकारला तीन महिने का दिले, ते मला कळत नाही. मी याबद्दल मुनगंटीवार यांना विचारणार आहे, असे ते म्हणाले.