सूरज दहाट | अमरावती : गांधी परिवाराला हात लावण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रासह देशातल्या काँग्रेस कार्यकर्ता व सामान्य माणूस पेटून उठेल, असा इशाराच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी भाजपला दिला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald) सक्तवसुली संचलनालयानं (ED) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना समन्स बजावलं आहे. या दोघांना चौकशीसाठी बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले आज अमरावती येथे बोलत होते.
नाना पटोले म्हणाले की, जेव्हा-जेव्हा भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर जायची वेळ येते. तेव्हा-तेव्हा गांधी परिवाराला व नेहरु परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो, असा आरोप त्यांनी केला. भाजप गांधी परिवाराला बदनाम करण्यासाठी या पद्धतीचा एक प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीच भाजप सरकार करत आहे. केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात येत आहे. सातत्याने 2014 पासून आपण या सरकारची भूमिका पाहिली आहे आणि या लोकांमुळे गांधी परिवाराला कोणीच साधा हातही लावू शकत नाही, या परिवाराची त्यागाची भूमिका या देशातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे आणि ज्या दिवशी या लोकांनी गांधी परिवाराला हात लावण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रासह देशातल्या काँग्रेस कार्यकर्ता व सामान्य माणूस पेटून उठेल आणि मग कितीही लोकांना जेलमध्ये जाण्यास तयार होतील. म्हणून त्याच्या वाटेला जाऊ नका हा आमचा प्रामाणिक आणि प्रेमाचा सल्ला केंद्रात मोदी सरकारला आहे, असे विधान पटोले यांनी अमरावतीत केलं.