शिर्डी : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु, कॉंग्रेसने (Congress) उत्तर प्रदेशच्या इमरान प्रतापगडी (Imran Pratapgarhi) यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेसची नेते मंडळी नाराजी झाली आहेत. काही नेत्यांनी या निर्णयावर टीकाही केली आहे. या टीकेला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आमचा उमेदवार देशातला आहे, परदेशातला नाही, असे म्हणत प्रत्त्युत्तर दिले आहे. शिर्डीत काँग्रेसचे दोन दिवसीय चिंतन शिबीर १ व २ जून रोजी पार पडत आहे. यामध्ये ते बोलत होते.
राज्यसभेसाठी अनेक जण उत्सुक असूनही कॉंग्रेसने उत्तर प्रदेशच्या इमरान प्रतापगडी यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेसमधील नेत्यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. याच नाराजीतून नागपुरचे कॉंग्रेस नेते आशिष शेलार यांनी तडकाफडकी राजीनामाही दिला. यानंतर कॉंग्रेसच्या राज्याबाहेरच्या उमेदवारीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, दुसऱ्या राज्यातील उमेदवार देणं हा काही नवा पायंडा नाही. आणि आमचा उमेदवार देशातला आहे, परदेशातला नाही. काँग्रेसमध्ये लोकशाही असून प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. भाजपसारखी हिटलरशाही कॉंग्रेसमध्ये नाही, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.
ते पुढे म्हणाले, हिमालय जेव्हा जेव्हा धोक्यात आला आहे तेव्हा तेव्हा सह्याद्री मदतीला धावून आला आहे. म्हणूनच शिर्डी येथे चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. उदयपूर नवसंकल्प शिबिरात आमच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी जे मार्गदर्शन केलं. तसेच, जे ठराव झाले त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे दोन दिवसीय शिबिर आयोजित केले आहे. प्रत्येक ठिकाणी एक दिवसाचं संकल्प शिबीर होणार असून प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा होणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.