राष्ट्रपिता एकच, इतर कुणाची ती पात्रता नाही; नाना पटोलेंचे अमृता फडणवीसांना उत्तर
नागपूर : राज्यापाल भगत सिंह कोश्यारीनंतर भाजप नेत्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात मोठे वादंग निर्माण झाले होते. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची भर पडली आहे. गांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे अमृता फडणवीसांनी म्हंटले आहे. यामुळे पुन्हा वादाला फोडणी मिळाली आहे. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले यांनी ट्विटरवरुन अमृता फडणवीस यांच्या विधानाला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, या देशाचे राष्ट्रपिता एकच आहेत आणि ते म्हणजे महात्मा गांधी! इतर कुणाची ती पात्रता नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच, एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी वल्गना बोम्मई खुलेआम करतात. शिंदे- फडणवीस मात्र अळीमिळी गुपचिळी! डरपोक ईडी सरकार, अशी टीकाही शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. मी स्वतःहून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करीत नाही. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते जल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही व घाबरतही नाही. मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.