भाजपा नेत्यांनी ओबीसींबद्दल मगरीचे अश्रू ढाळू नये; पटोलेंचे टीकास्त्र
उदय चक्रधर | भंडारा : ओबीसी आरक्षणावरुन भाजप आणि महाविकास आघाडी आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. गजनी छाप राजकारण करणाऱ्या लोकांपासून महाराष्ट्र मुक्त करू, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर केली होती. याला आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गजनीछाप राजकारण म्हणजे काय हे सुधीर मुनगंटीवारांनी आधी सांगावं, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
गजनीछाप राजकारण म्हणजे काय हे सुधीर मुनगंटीवारांनी आधी सांगावं. जनतेचे मुलभूत प्रश्न सोडून नौटंकी करणे हेच भाजपाचे काम आहे. भाजपाने आपल्या मंत्र्यांना नौटकी बंद करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी टीका नाना पटोलेंनी सुधीर मुनगंटीवारांवर केली आहे.
तर, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांना विचारा की ओबीसीचे खरे मारेकरी कोण आहेत? असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, भाजपाने ओबीसींची मते घेतली. मात्र, ओबीसींसाठी काय केलं याच उत्तर भाजपाने द्यावे. जातीनिहाय जनगणनेचा जो घोळ निर्माण झाला आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मूंग गिळून का आहेत? ओबीसींचे मारेकरी आम्ही नव्हे तर भाजपा आहे. भाजपा नेत्यांनी ओबीसींबद्दल मगरीचे अश्रू ढाळू नये, असे प्रत्युत्तर त्यांनी बावनकुळेंनी दिला आहे.
दरम्यान, ज्या भारतीय महिला कुस्तीपटूंनी देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांच्यावरच केंद्रातील जुलमी भाजपा सरकार अन्याय, अत्याचार करून अपमान करण्याचे पाप करीत आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या फोटो हटविण्याचे पापसुद्धा भाजपा सरकारने केले. या सरकारला महिलांसोबत काही देण-घेणं नसल्याची बोचरी टीका नाना पटोले यांनी केला.