हे राज्यपाल उद्या जाण्याऐवजी...; नाना पटोलेंचे टीकास्त्र
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. अशातच, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही टीकास्त्र सोडले आहे. राज्यपालांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना हटवलं पाहिजे. अशा प्रकारच्या विचारांच्या व्यक्तीची महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून गरज नाही, अशा शब्दात पटोलेंनी कोश्यारींवर टीका केली आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक व्यवस्थेचं पालन करणारे तेवढ्याच जबाबदारीचे राज्यपाल असले पाहिजे होते. पण तसं झालं नाही. म्हणून आमचं सातत्याने म्हणणं होतं की, राज्यपाल भवन हे भाजप भवन झालेलं आहे. महापुरुषांचा सातत्याने अवमान करणे आणि ते भाजपलाही आवडत होतं. त्यांच्या मंत्र्यांनीसुद्धा त्याबाबत वक्तव्य केलंय. त्यामुळे अशा विचारांचा राज्यपाल आमच्या राज्यात नकोच, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.
राज्यपालांवर भाजपचा मोठा आशीर्वाद होता. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान करणं त्यांना सगळ्यांना आवडत होतं. म्हणून उद्या जाण्याऐवजी हटवलं पाहिजे. त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना हटवलं पाहिजे. अशा प्रकारच्या विचारांच्या व्यक्तीची महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून गरज नाही, असा जोरदार घणाघात नाना पटोलेंनी भगत सिंह कोश्यारींवर केला आहे.