नाना पटोलेंना होमग्राऊंडवर मोठा धक्का! कार्यशैलीवर नाराज होत काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षांचा राजीनामा
उदय चक्रधर | गोंदिया : महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्यावर कॉंग्रेस पक्षातील विविध नेत्यांनी गंभीर आरोप करत त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. ही संपूर्ण परिस्थिती ताजी असतानाच आता नाना पटोले यांच्याच होमग्राऊंड असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
कॉंग्रेस पक्षाचे आज छत्तीसगड येथील रायपुर येथे महा अधिवेशन पार पडत आहे. त्या दरम्यान कॉंग्रेस पक्षातील विविध नेते या महाअधिवेशनाला हजेरी लावणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील थोरात पटोले वादावर चर्चा होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांच्या कारभारावर कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर नाना पटोले यांच्या कारभाराला कंटाळून अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. अशातच, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्षांनी रत्नदीप दहीवले यांनी राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत रत्नदीप दहीवले यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, अध्यक्षपदावरुन नाना पटोलेंना हटवा आणि शिवाजीराव मोघेंना अध्यक्ष करा, अशी मागणी मोघे समर्थकांनी केली आहे. विदर्भातील 24 नेत्यांनी नाना पटोलेंना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. नाना पटोलेंनी प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी आणली, पक्षात दलित-मुस्लिम आणि आदिवासी यांना दूर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.