शिंदे-फडणवीसांना सरकार जाण्याची चाहुल लागली; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर पटोलेंचा निशाणा
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान न्यायलयाने अनेक प्रश्न उपस्थित करत तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहे. यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेत लगबग सुरु आहे. बहुधा त्यांना काहीतरी सरकार जाण्याची चाहुल लागली आहे असे वाटते, अशी टीका त्यांनी केली आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना सरन्याधीशांनी जी निरिक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो की काय या भीतीने सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी ट्रोल केले हे लांछनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहित असून सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पटोलेंनी केली आहे.
सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल यावर भाष्य करणे योग्य नाही. परंतु, मंत्रालयात लगबग सुरु झाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांना काहीतरी चाहुल लागली आहे असे वाटते. साधारणतः सरकारचा कालावधी संपताना किंवा सरकार जाऊ शकते अशी वेळ येते त्यावेळी अशी लगबग सुरु असते. आम्ही सर्वोच्च न्यायलयातील निकालाची वाट पहात आहोत, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
दरम्यान, बागेश्वर बाबांचे महाराष्ट्रात कार्यक्रम होणार आहे. याला कॉंग्रेसने विरोध केला असून नाना पटोले म्हणाले की, संतांच्या विचारात मोठी ताकद आहे. भ्रष्ट विचाराचे कोणी स्वतःलाच संत म्हणून घेत असेल तर ते बरोबर नाही. आमच्यासाठी संत तुकाराम महाराज हे सर्वश्रेष्ठ आहेत. महाराष्ट्रात येऊन जर संत तुकाराम महाराज यांचा कोणी अपमान करत असेल तर ते अजिबात चालणार नाही. संतांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.