आता प्रजा आणि राजा कोण? हे जनतेने दाखवून दिलं; पटोलेंचा भाजपवर निशाणा
मुंबई : शिक्षक, पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीचे निकाल लागले असून चार जागा मविआच्या ताब्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपने सत्तेचा दुरुपयोग केला, त्याची फळ त्यांना आता मिळत आहे. नागपूर, अमरावती या दोन्ही भागात भाजपने पण आम्हाला मदत केली, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
भाजपने सत्तेचा दुरुपयोग केला, त्याची फळ त्यांना आता मिळत आहे. लोकांना नोकऱ्या देऊ हे आश्वासन दिलं पण जे लागले त्यांना बाहेर काढलं. जुन्या पेन्शनबाबत दोगली नीती दाखवली. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे सगळं होत आहे. जनतेमध्ये या सगळ्याला तीव्र निषेध केला जात आहे. जो निकाल आला त्यात जनतेने आता दाखवून आहे. आता प्रजा आणि राजा कोण हे जनतेने दाखवून दिलं, असा निशाणा नाना पटोले यांनी भाजपवर साधला आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी धीराने हे युद्ध लढले. जसा प्रतिसाद भारत जोडोला मिळाला त्याचा परिणाम दिसून आलाय. भाजप दुसऱ्यांची घरं फोडते तेव्हा त्यांना आनंद होतो. जेव्हा यांचं घर फुटेल तेव्हा यांना कळेल हे मी बोललो. नागपूर, अमरावती या दोन्ही भागात भाजपने पण आम्हाला मदत केली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसचं घर तोडलं ते मला जिव्हारी लागेल. आमचा एक घेतला पण आम्ही यांचे अधिकारी खेचून आणू, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.
तर, अजित पवार यांच्या विधानावर नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीने सुद्धा त्यांना निवडून देण्यात मदत केली आहे असं वाटतंय. अजित दाद एक जबाबदार व्यक्ती आहे ते असं बोलतात हे नवल आहे. मविआ नेते बसतील आणि काय तो खुलासा करतील, असे त्यांनी सांगितले.