माझ्या घातपाताच्या शक्यतेला केसरकरांनी दिली पुष्टी; सुषमा अंधारेंचा मोठा दावा
मुंबई : राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. अशातच, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा आरोप केला होता. माझा घातपात होण्याची शक्यताच त्यांनी वर्तवली होती. यावरुन त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीकास्त्र सोडले आहे. परंतु, याला शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांनी पुष्टी दिल्याचे अंधारेंनी म्हंटले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, काल मी चंद्रपूरच्या सभेमध्ये माझा घातपात होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आणि आज दीपक केसरकर यांनी माझ्या बोलण्याला पुष्टी देत म्हटलं की सूक्ष्म अंधारे यांनी भाषा सुधारावी. भाषा सुधारली नाही तर असं घडू शकतं. केसरकर जी ज्या पद्धतीने आज बोलत होते एका अर्थाने ते कालच्या माझ्या शक्यतेला अधिक पुष्टी देत होते. पण, माझं बोलणं हे ट्रेक ठरवणारे ते सरकार आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बोलण्याकडे का लक्ष देत नसतील बरे, असा सवालाही त्यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?
माझ्याविरोधात तक्रारी दाखल होतील. आगामी काळात माझ्यावर काही संकटे येऊ शकतात. मात्र, मला त्याची पर्वा नाही. मला वाटते की माणसे जागी झाली पाहिजेत. काही लोक, अधिकारी मला सांगतात की, रात्रीचा प्रवास टाळा. घात-अपघात होऊ शकतो. आतापर्यंत अपघातात अनेकजण गेले आहेत. तुमच्यावर आरोप करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते तुम्हाला थेट गोळी घालण्याऐवजी तुमचा अपघात घडवून आणू शकतात. माझी प्रतिकात्मक तिरडी बांधू देत किंवा प्रत्यक्ष तिरडी बांधू देत, मी मात्र माझे काम प्रमाणिकपणे करण्याचे ठरवलेले आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले होते.