पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा; कॉंग्रेसची बैठकीत मागणी
मुंबई : राजकीय घडामोडींना आता वेग आला असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या निर्णयांचा सपाटा सुरूच ठेवला असून आज पुन्हा कॅबिनेट बैठक बोलवली आहे. यावेळी पुणे शहाराचे नाव जिजाऊ नगर करा, अशी मागणी कॉंग्रेसने बैठकीत केली आहे.
राज्यपालांकडून आज बहुमत सिद्ध करण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असले तरीही ठाकरे सरकार काय थांबायचे नाव घेत नसून आजही कॅबिनेट बैठक बोलवली आहे. या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर होण्याची शक्यता असून सोबतच उस्मानाबादचेही धाराशिव नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. यादरम्यान पुणे शहाराचे नाव जिजाऊ नगर करा, अशी मागणी कॉंग्रेसने बैठकीत केली आहे.
नामांतर प्रस्तावावरुन कॉंग्रेस-शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता असतानाच कॉंग्रेसचे वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे दोन मंत्री बैठकीआधीच बाहेर पडले आहेत. आणि चर्चांना एकच उधाण आले. परंतु, बैठकींची फाईल राहिल्याने बाहेर आल्याचे स्पष्टीकरण वर्षा गायकवाड यांनी दिले आहे
दरम्यान, राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवत ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार आहे. यामुळे आता शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक उद्या समोरसमोर येण्याची शक्यता आहे. यानुसार मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.