राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक; पहिला टोलनाका पेटवला
मुंबई : मनसेच्या टोल नाकाविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मुलुंड टोलनाक्यावर आधी मनसे नेते अविनाश जाधव यांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. मात्र, त्यांना ताब्यात घेतल्यावर काही मनसैनिकांनी टोलनाका पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ही केबिन आणि त्यातील साहित्य जाळून खाक झाले आहे.
टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे. प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभे राहतील. लहान वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक होत पनवेल, मुलुंडच्या टोलनाक्यावर हजर झाले होते. टोल न भरताच चारचाकी वाहनं मनसेकडून सोडण्यात येत होती. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन सुरु होते. यादरम्यान आता अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
यानंतर मात्र मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून मुलुंड टोलनाका पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर टोल नाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल आणि टायर पेटून टाकण्यात आले आहे. यामुळे ही केबिन आणि त्यातील साहित्य जाळून खाक झाले आहे.