अजित पवारांविरोधात खोचक ट्विट मोहित कंबोज यांना भोवलं; वरिष्ठांकडून तंबी
मुंबई : अजित पवार मुख्यमंत्री व्हावं असं साकडं त्यांच्या समर्थकांनी लालबाग राजाच्या चरणी घातलं आहे. यावरुन अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियाही उमटत आहे. अशातच, भाजप नेते मोहित कंबोज यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. याची गंभीर दखल भाजपने घेत कंबोज यांना वरिष्ठांकडून तंबी दिल्याचे समजत आहे.
अजित पवारांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या समर्थकांनी लालबाग राजाच्या चरणी एक चिठ्ठी ठेवली. त्यात अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे असं लिहिण्यात आलं होते. यावरुन मोहित कंबोज यांनी अजित पवारांविरुध्द खोचक ट्विट केले होते. मुख्यमंत्री बनण्यासाठी 145 आमदार पाहिजे. केवळ 45 नाही, असा टोला त्यांनी लगावला होता. ही टीका कंबोज यांना चांगलीच भोवली आहे. मोहित कंबोज यांना भाजप वरिष्ठांकडून तंबी देण्यात आल्याचे समजते. यानंतर मोहित कंबोज यांनी ट्विट डिलीट केले आहे.
दरम्यान, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटते की अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तसेच वाटते, काँग्रेसमध्ये 15 नेते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, असे बावनकुळेंनी म्हंटले आहे.