शिंदे गट, भाजपसोबत मनसेची युती होणार? मनसे आमदार राजू पाटील सूचक विधान; म्हणाले, आमची मनं जुळली...
राज्यात एकीकडे जश्या राजकीय घडामोडी तीव्र होत आहेत सोबतच शिंदे गट, भाजप आणि मनसेची युती होईल ही चर्चा सुद्धा तीव्र झाली आहे. ही चर्चा होत असतानाच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काल संध्याकाळच्या सुमारास डोंबिवली येथील फडके रोड संध्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमानंतर खासदार शिंदे यांनी जवळच असलेल्या मनसे कार्यालयाला भेट दिली. या भेटीमुळे राजकारणात शिंदे गट,भाजप आणि मनसेत युती होणार अशी एकच चर्चा सुरु झाली. आता त्यावरूनच मनसे आमदार राजू पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले राजू पाटील?
आमदार राजू पाटील म्हणाले की, "फडके रोड येथे सर्व संस्थांचे कार्यक्रम होत असतात. चांगल्या सणाच्या वेळी कुणी आडकाठी करत नाही, तशी आपली संस्कृती पण नाही. काल खासदार श्रीकांत शिंदे फडके रोड येथे आले होते. मनसे शहर अध्यक्षांनी त्यांना मनसे कार्यालयात येण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन श्रीकांत शिंदे त्या ठिकाणी आले. आम्ही राजकारणात जरी विरोधक असलो तरी दुश्मन नक्कीच नाही." असे ते यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "वैयक्तिक असे काही नसते, एकमेकाला चांगल्या शुभेच्छा आम्ही नेहमीच देत असतो. युती करायची की नाही करायची तो सर्वस्वी निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आहे. त्यांनी आम्हाला स्वतंत्र लढण्याचा आदेश दिला असून आम्ही ती तयारी करतोय. ती आमची तयारी नेहमीच असते. त्यांनी सांगितलं भविष्यात आपल्याला युती सोबत जायचंय, तर आम्ही त्यालाही तयार आहोत. मात्र एक निश्चित, इथे आमची मनं जुळली आहेत. वरून तारा जुळल्या की सगळे जुळून येईल." असे सूचक विधान यावेळी आमदार राजू पाटील यांनी केले आहे.