बंड झाले, आता थंड; मनसेने एकनाथ शिंदेंना सुनावले
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत सत्ता स्थापन करुन सव्वा महिना उलटला तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरुन शिंदे सरकारवर विरोधकांकडून सतत टीका सुरु असून यात मनसेही मागे राहीलेली नाही. बंड झाले, आता थंड झाले, अशा शब्दांत मनसेने शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
शिंदे सरकारला विधानसभेत मनसेनेही समर्थन दिले होते. यानंतर मनसेला मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशा चर्चा सुरु होत्या. परंतु, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन सव्वा महिना झाला असला तरीही राज्याला मंत्री आणि पालकमंत्री मिळालेले नाहीत. यावरुन मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे.
ते म्हणाले, बंड झाले, आता थंड झाले ? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्ह्याला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल, असा सवाल राजू पाटील यांनी विचारला आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर महत्वपूर्ण बैठक होणार आहे. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेणार आहेत. या अनुषगांने वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.