हल्ल्यामागचा क्रिकेटर नाही तर कोच पण बाहेर येईल; संदीप देशपाडेंचा सूचक इशारा
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉक गेले असता अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत घटना सांगितली. केवळ क्रिकेटर नाही तर कोच पण बाहेर येतील. जेव्हा आरोपी पकडला जाईल तेव्हा मी अधिक बोलेन. ही वीरप्पन गँग कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे, असा निशणाही त्यांनी ठाकरे गटावर साधला.
पहिली गोष्ट महाराष्ट्र सैनिक व सर्व पक्षीय नेत्यांचे आभार मानतो. माझ्याबद्दल प्रेम व्यक्त केलं त्यांचा मी ऋणी आहे. मी काल वॉकला गेलो आणि 5 नंबर गेट वरून पुढे चालत होतो. पाठीमागून अचानक अज्ञातांनी हल्ला केला. मला सुरुवातीला वाटलं सिझन बॉल लागला. पण, एकने मागून स्टम्पने हल्ला केला. मी बचावासाठी दांडा पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका माझ्या हातावर बसला. यावेळी परिसरातील लोक धावून आल्याने हल्लेखोर पळून गेले, असे संदीप देशपाडे यांनी सांगितले.
पोलीस आता तपास करत असून चौकशी करत आहेत. मला पोलिसांवर विश्वास आहे. केवळ क्रिकेटर नाही तर कोच पण बाहेर येतील. जेव्हा आरोपी पकडला जाईल तेव्हा मी अधिक बोलेन. आम्ही कोविड संदर्भात एक तक्रार केली होती. यानंतर बाळा कदम यांना अटक केली व 48 तासात ही घटना घडली. ही घटना घडल्यावर मुख्यमंत्री यांचा मला फोन आला होता. आणि माझ्या सुरक्षेसाठी 2 पोलीस ठेवले आहेत. आम्ही कोणाला घाबरत नाही. यामुळे ही सुरक्षा काढून घ्यावी ही नम्र विनंती. आता जर सुरक्षा द्यायची असेल तर ती आता त्यांना द्या, असेही त्यांनी म्हंटले आहे.
ही वीरप्पन गँग कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे. दोन फर्म आहेत महावीर आणि ग्रेस फर्निचर आहेत. 10 लाखांचा टर्नओव्हर कोविड नंतर कोट्यावधीवर गेला. जर एखादा कंत्राटदार एखादी गोष्ट पुरवत आहेत तर ते त्याने खरेदी केलं पाहिजे. मी आयुक्तांना भेटलो. हा जो घोटाळा आहे, देढिया नावाचा एक माणूस आहे. त्याचे देखील फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आहे. हे सगळे घोटाळे आणि गोष्टी त्यांना बंद करायच्या असत्या तर माझ्या थोबाडवर मारायला हवं होतं. मगच माझं थोबाड बंद झालं असतं, असेही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.