फटाक्यांचा त्रास होतोय तर बॅगा भरायच्या अन् देश सोडून निघून जायचं; तक्रार करणाऱ्या मुस्लिमांना मनसेने सुनावलं

फटाक्यांचा त्रास होतोय तर बॅगा भरायच्या अन् देश सोडून निघून जायचं; तक्रार करणाऱ्या मुस्लिमांना मनसेने सुनावलं

मशिदीवरील भोंग्यांवरुन पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेकडून केलेल्या ट्वीटमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Published on

मुंबई : मशिदीवरील भोंग्यांवरुन पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेकडून केलेल्या ट्वीटमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रात्री फटाके वाजत असल्याने काही मुस्लीम व्यक्तींनी तक्रार केली होती. यावरुन मनसेने संताप व्यक्त केला असून आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा, अशा शब्दात मनसेने सुनावले आहे.

मुस्लीम व्यक्तींच्या तक्रारीवर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल. त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा, असा दमच खोपकर यांनी ट्विटरवरुन दिला आहे.

मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनीही यावर भाष्य केले आहे. विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतो आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही. मात्र, तुमची अजान अजुनही भोंग्यावर अनेक ठिकाणी सुरू आहे. थोडं सहन करा कारण दिवाळी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

काय आहे प्रकरण?

ट्विटरवर एका मुस्लीम व्यक्तीने पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली होती. रात्रीचे दोन वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचं ट्वीट करत त्याने पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. तर आणखी एका व्यक्तीने पहाटे ४.३० वाजता फटाके फोडले जात असल्याची तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी या दोन्ही ट्वीटरला उत्तर देत संबंधितांना कळवण्यात आल्याचं सांगितलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com